Shivaji Maharaj Powada Lyrics in Marathi – शाहीर नानिवडेकर

Following are Shivaji Maharaj Powada Lyrics in Marathi शाहीर नानिवडेकर. Find more lyrics below of shivaji maharaj.

Shivaji Maharaj Powada Lyrics in Marathi – शाहीर नानिवडेकर 

छत्रपती शिवाजी रणशूर । घेऊनि तलवार । मोंगल जर्जर । करुनि राखिला हिंदुधर्मास ॥



स्थापियली स्वतंत्रता देशास । झळकला हिरा महाराष्ट्रास ॥जी॥


भोजराजा माहित सकलांस । रजपूत वंश । त्याचा जो अंश । वाढला म्हणती भोंसला त्यास ॥

त्याच कुळिं शहाजी आला जन्मास । पराक्रमी महान्‌ वचक यवनांस ॥
धन्य वीर शहाजी भोंसला । पिता शोभला । शिवाजी राजाला । जिजाबाई माता जन्म देई ॥
शिवनेरी किल्याच्या ठायीं । किल्ला हा पुण्यानजिक हाई ॥
शके १५५१ सं । फाल्गुन महिन्यास । वद्य तृतीयेस । शिवाजी रुपें शंकर अवतरला ॥
सुटला थरकांप दुश्मानांला ।घडा पापांचा त्यांचा भरला ॥
जसा बाळ शिवाजी वाढला । चंद्र भासला । जिजाऊ मातेला । बहुत शिकविल्या कला तिनं त्यास ॥
सांगुन पूर्वजांचा शौर्य इतिहास । ओनामा वीरश्रीचा पढविला त्यास ॥
बाळ शिवाजी पुसी मातेला । सांग आई मला । सर्व माहितीला । यवन हा आला कोठून ॥
इथं कसा बसला राज्य घेऊन । आई मला सांग पहिल्यापासून ॥
आला खैबर खिंडींतून । सिंध जिंकून । पंजाबांतून । दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ॥
खङगा फिरवुनी वारंवार । रक्ताचे वाहवले पूर ॥
तें मयूर सिंहासन । खुशाल भोगून । देश दख्खन । जिंकाया यवन येऊन भिडले ॥
हिंदी वीरांचे मुडदे पडले । अखेर यवनांचें निशाण चढलें ॥
चाल
शहाजहान बादशहा होता तवां दिल्ली तख्ताला ॥
निजामशाही राज्य अहमदनगर मुलुखाला ॥
आदिलशाही मुसलमानी राज्य विजापूराला ॥
कुतुबशाही राज्य यवनांचं गोवळकोंडयाला ॥
सार्‍या हिंदुस्थानभर मुसलमान पसरला ॥
सारी सत्ता मोंगलांची थारा न्हवता हिंदूला ॥
मानाच्या जागा मोठाल्या सार्‍या यवनांला ॥
शिपाईगिरी तेवढी हिंदूंच्या राहिली वाटयाला ॥
बाटवुनी करती मुसलमान गरीब रयतेला ॥
कापिती गायी चरचरा हामरस्त्यांला ॥
अबलांना कोणी रे वाली नाहीं राहिला ॥
हिंदुधर्म बुडाला जो तो बोलुं लागला ॥
हे शब्द ऐकूनी शिवाजी बाळ खवळला ॥
रागानं लाल तो झाला । डोळे फाडुन बघूं लागला । करकरा चावुनि ओंठाला । बोलला जिजाऊ मातेला । बोलुं नको पुन्हां कीं ग हिंदुधर्म लोपला ॥
कशि लढाई करायची आई शिकिव तूं मला ॥
देशाचा करिन उद्धार सांगतों तुला ॥
बारा वर्षं न्हवती झाली शिवाजीच्या उमरीला ॥
असा लहानपणांत लढाईचा ओनामा घेतला ॥
भाला विटा तिरकमटा निशाणबाजी शिकला ॥
ढाल पट्टा फिरंगीचे वार फिरवूं लागला ॥
घोडयावरतं बसुन भरधांव दौडुं लागला ॥
खडान् खडा देशाची माहिती घेऊं लागला ॥
कोणकोणते किल्ले आणि शहरं हायत मुलखाला ॥
चाल: मिळवणी
दादोजी कोंडदेवानं । जिजाऊ मातेनं । दिलं शिक्षण । शिकविला भूगोल आणि इतिहास ॥
(भारताचा भूगोल आणि इतिहास ) वर्म समजला शिवाजी खास । धरला मनिं स्वातंत्र्याचा ध्यास ॥
चौक २
खेळगडी मित्र जमविले । तान्हाजी भले । येसाजी आले । आले बाजी पासलकर दोस्त ॥
स्वराज्याचा ध्यास अहोरात । शपथा घेती रोहिडेश्वरापुढतं ॥
मग आपुल्या जहागीरींत । (पुण्याच्या मुलखांत) करुनी बंदोबस्त । लावितो शिस्त । सदगुणी बाळ जिजाईचा ॥
सुपुत्र शहाजी राजाचा । चेला दादोजी कोंडदेवाचा ॥
गेली काळ विजापूरला । बादशाह लाल झाला । हुकूम काय केला । बोलावून शहाजी राजाला ॥
ताकिद द्या तुमच्या शिवाजीला । नाहींतर आणा दरबाराला ॥
जिजामाता घेऊन बरोबर । घोडयावर स्वार । गांठी विजापूर । शिवाजी बाळ मोठया जल्दीनं ॥
वंदुनिया बापाचे चरण । कां हो म्हणी केलं बोलावणं ॥
बापाचा हात हिसडून । गेला धांवुन । तलवार उगारुन । कसाबाचा हात कलम केला ॥
गाईचा प्राण वाचवीला । विजापूर वेशीच्या रस्त्याला ॥
चाल: दांगट
आला बादशाहाच्या दरबाराला । नाहीं त्यानं कुर्नीसात केला । नाहीं त्यानं लवुन मुजरा केला । राग भारी चढला बादशाहाला ।
आज्ञा करी बादशाहा शहाजीला । रीत नाहीं तुमच्या या मुलग्याला । दरबाराची शिस्त शिकवा त्याला । बाप मग बोलतो शिवाजीला । ऐक बाळा गोष्ट सांगतों तुजला । लवुन कर मुजरा बादशाहाला । अन्न देणारे हेच आम्हाला । आईबाप बादशाहाच आपुणांला ।
मान द्यावा अन्न देणार्‍याला ॥
दरबारांत दादा ॥
बापाला शिवाजी बोलला । ऐका समयाला । नमीन म्हणी भवानी शंकराला । नमीन एक माता न् पितयाला । सद्‌गुरु गोमाता ब्राह्मणांला । नाहीं नमणार मोंगलाला । अपमान नाहीं सहन व्हायचा मजला । यायचा नाहीं यापुढं दरबाराला । पाय नाहीं ठेवायचा विजापूरला । निरोप बापाचा घेऊन निघाला । जिजाबाई घेतली संगतीला । थेट आला पुण्याच्या शहराला । करतो प्रार्थना भवानीला ॥
हो भक्तीनं दादा ॥
चाल: मिळवणी
जय भवानी म्हणी सत्वर । प्रसन्न मजवर । होऊनि दे वर । सोडीव बंदीवान् हिंदु बांधवांस ॥
देऊनि जीवादान गायीब्राह्मणांस । जगवि सनातन हिंदुधर्मास ॥
चौक ३
शिवाजीचा निर्धार पुरा ठरला । भोसले वंशाला । (रजपूत वंशाला) आलों मी जन्माला । करिन सार्थक खरा पुरुषार्थ ॥
स्वतःच्या कमाईचा घांस खाण्यांत । नाहीं परक्यांची हांजी करण्यांत ॥
चाल
तोरणा गडावर स्वातंत्र्याचें बांधुन तोरण । फडकविला झेंडा शिवाजीनं ॥
बाई जवळचा मुलुख जावळी घेतला जिंकून । प्रतापगड बांधला नवीन ॥
मावळे शेतकरी वीर जमविले गोष्टी बोलून । तलवारी बक्षीस देऊन ॥
सैन्य उभारलं हां हां म्हणतां शिवाजी राजानं । सर्वदा भवानी प्रसन्न ॥
किल्ला बांधतां पाया खणतां सांपडलें धन । लक्षुमी झाली प्रसन्न ॥
स्वातंत्र्याचें शिंग गर्जलें सह्याद्रीमधुन । बादशाहा झाला बेभान ॥
चाल: मिळवणी
विजापूरच्या आदिलशहाला । संशय असा आला । शिवाजी राजाला । असावा बाप शहाजी फूस देणार ॥
शिक्षा शहाजीला बादशाहा देणार । भिंतीमध्यें चिणून ठार करणार ॥
ही बातमी कळली शिवाजीला । उपाय योजला । बाप मुक्त केला । दिल्लीपति दोस्त केला समयास ॥
परस्पर धमकी आदिलशाहास । शहाजीला सोडणं भाग झालं त्यास ॥
मुत्सद्दी शिवाजी खरोखर । कार्य संपल्यावर । बादशहाबरोबर । शत्रु समजुनी जपुनि वागणार ॥
सावधपणे पावलं टाकणार । दोघांशी एकला टक्कर देणार ॥
शिवाजीचा कांटा काढाया । दोन्ही बादशाह्या । करिति कारवाया । शिवाजी फसला नाहीं कवणास ॥
गीतेचा मनन केला अभ्यास । ठोशाशी ठोसा देणं समयास ॥
चौक ४
पैजेचा विडा उचलून । मोठया तोर्‍यानं । आफझल्लखान । निघाला विजापुराहून ॥
शिवाजीला आणतों मी पकडून । बरळला खान शेंफारुन ॥ शिवाजी तो उंदिर डोंगराचा ।
मराठी बच्चा । नेम काय त्याचा । कदाचित घेईल अपुला प्राण ॥
सगें वीस हजार सैन्य घेऊन । निघाला मोठया तय्यारीनं ॥
तुळजापुरला धडक मारिली । भवानी भरडली । जाळपोळ केली । प्रलय मांडला पंढरपुरला ॥
प्रजा केली हैराण रस्त्याला । येऊन धडकला प्रतापगडाला ॥
चाल
खानाला चढली बेफाम धुंदी बरळला ॥
मेला देव हिंदूंचा धर्म त्यांचा संपला ॥
किती मूर्ख हिंदु हे देव म्हणती दगडाला ॥दाढीवरनं हात फिरवीत डुलाय लागला ॥
दगडांत देव तंवा न्हवता खचित राहिलेला ॥
तो गेला होता कुठं ऐका सांगतों तुम्हांला ॥
संचरुन अंगामध्यें शिवाजीच्या प्रगटला ॥ कर तुकडे तुकडे खानाचे । कापून आण शिर त्याचें । भिऊं नको साह्य हाय आमुचें । तुळजापुरची भवानी नी विठोबा बोलूं लागला ॥
चाल: मिळवणी
खान प्रतापगडासी आला । वर्दी शिवाजीला । यावं भेटीला । कृष्णाजी पंत वकील धाडून ॥
शिवाजीन बांका वकुत वळखून । बहाणा समेटाचा दिला पटवून ॥
प्रतापगडाच्या पायथ्याखालीं । भेट ठरविली । तयारी करविली । शामियाना खास उभारुन ॥
मोत्याच्या झालरी लावून । शृंगारिला तंबू शिवाजीनं ॥
पंताजी गोपीनाथ भला । वकील आपुला । धाडुनी दिला । खानाला पुरता फसवायाला ॥ शिवाजी बघा तुम्हांस लै भ्याला । द्यावं जीवदान शिवाजीला ॥
भवानीनं स्वप्नीं येऊन । केलं वरदान । सावध रे पूर्ण । भेटीमधीं दगा करील रे खान ॥
वर्म त्याचं पुरतें ओळखून । भेटीला जा रे हुषारीनं ॥
चाल
भवानीचं होतां वरदान शिवबा हर्षला ॥
जाळीदार चिलखत सार्‍या आंगभर त्याला ॥
त्यावरनं लांब भरजरी झगा चढविला ॥
पोलादाचं शिरस्त्राण वरुन फेटा बांधला ॥
वाघनखं पोलादी धरली डाव्या पंजाला ॥
लटकावली भवानी तलवार डाव्या कमरेला ॥
चाल
भवानीचं घेतलं दर्शन । जिजा आईला केलं वंदन । आशीर्वाद त्यांचा मिळवून । शिवराय चालले निकडीनं । जिवा महाला, संभाजी कावजी वीर संगतीला ॥
अफझुल्लखानाच्या समोर येऊन ठाकला ॥
खान घाली झेंप शिवाजीला धरुन मारण्याला ॥
जणुं घालावी झेंप पतंगानं प्रखर ज्योतीला ॥
शरीरानं खान धिप्पाड शिवाजी धाकला ॥
शिवाजीच्या दसपटीचं बळ होतं खानाला ॥
उंदरासारखा टाकीन चिरडून म्हणतो शिवाजीला ॥
धरुन मुंडकं शिवाजीचं काखेंत चिरडूं लागला ॥
शिवाजीच्या बरगडींत कटयार भोसकूं लागला ॥
त्याच्या बाचं बारसं होता शिवाजी वीर जेवलेला ॥
चिलखत मजबूत अंगाला । कटयारीनं दगा नाहीं केला ।
खर्र खर्र आवाज वरच्यावर झाला । शिवाजीनं विचार मनीं केला । शुभ शकुन खानानं केला । आतां करुंया म्हणी डावासी डाव आपुला ॥
वाद्यनखं भोंसकून खानाचा कोथळा फाडला ॥
आंतडयाचा गोळा पोटात्‍नं बाहेर काढला ॥
खान अल्ला अल्ला बोलला । तोबा तोबा तोबा बोलला । दगा दगा ओरडूं लागला । त्याबरोबर सय्यद बंडा धांवुनिया आला ॥
शिवाजीच्या शिरावर पट्टा त्यानं उगारला ॥
हां हां म्हणता जिवा महाला आडवा त्याला भिडला ॥
पट्टयाचा वरच्यावर वार त्यानं तोडला ॥
खानाला शिवाजीनं पुरता खालीं पाडला ॥
होता जिवा म्हणुनि कीं हो शिवा वाचला आपुला ॥
चाल: मिळवणी
तोफांचे वार उडविले । सैन्य लढविलें । दडवुन ठेवलेलें । रानोमाळ पाटच रक्ताचे ॥
विजयी तें सैन्य मराठयांचें । वंदिती पाय शिवाजीचे ॥
प्रतापगडी भवानी म्होरं । खानाचं शिर । वाहुन सत्वर । जिजाबाई चरणीं लीन झाला ॥
मातोश्री ओवाळी त्याला । पाणी दोघांच्या नयनांला ॥
आल्या खवळून शाह्या दोन्ही । खङग परजुनी । सूड गर्जुनी । शिवाजीचा पूर्ण कराया नाश ॥
शिवाजी पुरुन उरला उभयांस । रम्य तो भाग पुढल्या चौकास ॥
चौक ५ चाल
एकाहुनि एक शिवरायाचे प्रतापी सरदार । स्वातंत्र्याच्या मानकर्‍यांचा करुं या जैकार ॥ध्रु॥
पन्हाळगडला वेढा घालितो शिद्दी जोहार । त्यांतून जातो निसटुन अमुचा शिवबा रणशूर ॥
विशाळगडची खिंड रोखितो बाजी सरदार । अगणित शत्रूसंगें एकला टक्कर देणार ॥
चाल
शिवराय गडावर गेले । सुखरुप जाऊन पोंचले । तोफांचे बार ऐकले । बाजीने प्राण सोडीले । घोडखिंडीमधीं अजून घुमतो बाजी सरदार ॥
स्वातंत्र्याच्या०॥ अफाट सेना शाहिस्त्याने आणली पुण्यावर । त्याचीं बोटेंछाटुन त्याला पळवियला दूर ॥
भेटीसाठीं आग्रा शहरी शिवबा जाणार । दगा करोनी बादशहा त्याला अटक करणार ॥
चाल
हिंमत धरुनी मोठी । कपटासी बनला कपटी । किती वर्णाव्या त्या गोष्टी ॥
चाल
पेटार्‍यामधि बसुन निसटला शिवाजी बाहेर । बैराग्याच्या वेशें आला रायगडावर ॥
माझ्या शिवबा ये रे झडकरी भेट मला देई । आरती आणिते ओंवाळीते म्हणे जिजाबाई ॥
नयनांमधुनी टप् टप् अश्रू ओघळती मोती । आरती भरली स्वातंत्र्याची कांठोकांठ पुरती ॥
सत्यपाठीं भवानी माता सदैव असणार । स्वातंत्र्याच्या ॥
पुरंदरावर मुरारबाजी कमाल करणार । शिरावांचुनी धड झुंजलें अजब चमत्कार ॥
मध्यरात्रीला कोंडाण्यावर घोरपड लावणार । निधडया छातीचा तानाजी तो चढला कडयावर ॥
चाल
येसाजी हाडकुळा दिसला । परी हत्तीसंगें लढला । हत्तीनें मोर्चा फिरवीला । येसाजीनें पट्टा धरिला ।।
चाल
एक्या वारामधीं सोंड हत्तीची चिरी आरपार । स्वातंत्र्याच्या ॥
पवाडा गातां रंगुनि जातो नानिवडेकर । महाराष्ट्राचा तुमचा लाडका महादेव शाहीर ॥
वीर रसाचीं गाणीं मर्दाविण कुणास कळणार । चुकी भूलीला क्षमा असावी करतो नमस्कार ॥
चाल
अशापरी यवनांची दिली झुगारुन सत्ता शिवाजीनं ॥
तीस वर्षे अहोरात्र खपून स्वतंत्रता मिळवून ॥
रायगड किल्ला राज्याभिषेकाला योग्य ठिकाण पाहुन ॥
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी उत्तम मुहूर्त काढला शोधून ॥
सिंहासनारुढ झाले छत्रपति शिवाजी धन्य तो दिन ॥
शके १५९६ साली हे अपूर्व राज्यारोहण ॥
चाल: मिळवणी
स्वातंत्र्य पूर्ण मिळवून । शिवाजी विनयानं । करी वंदन । जिजाऊ मातेच्या चरणांस ॥
अश्रूंच्या धारा त्यांच्या नेत्रांस । रायगडीं घडला सत्य इतिहास ॥
स्वातंत्र्यवीर शोभला । भारतीं भला । तोड नाहीं ज्याला । रक्षी जो देव देश धर्मास ॥
ब्रीद गोब्राह्मण पालक खास ॥ झळकला हिरा महाराष्ट्रास ॥
परस्त्रीस मानितो माता । भगवद् गीता । धरुनियां हातां । शरीरसंपदा देशकार्यास ॥
सज्ज ठोशांस ठोसा देण्यास । झळकला ॥
शिवाजी तो शिवाजीच खरा । कोहिनूर हिरा । झळकला तु रा । मराठी जरिपटका मुलखांस ॥
डंका गर्जला चारी खंडास । झळकला ॥
दर्यात दुर्ग बांधिले । कोट उभविले । खड्‌ग फिरविलें । क्षणामधिं केला रिपूंचा नाश ॥
महादेव गातो त्याच्या कवनास । झळकला ॥
श्रोत्यांनो पोवाडा ऐकुनी । जाल परतुनी । मर्म घ्या ध्यानीं । क्षात्रतेजाचा धरा हव्यास ॥
जन्मुं द्या शिवाजी अजिं समयास । झळकुंद्या ॥
महादेव तुमचा शाहीर नानिवडेकर । कवन करणार । किसरुळ गांवीं जन्मला खास ॥
ठिकाण हे कोल्हापूर जिल्ह्यास । झळकला हिरा महाराष्ट्रास ॥
माहिती: कुमार भवार
Shivaji-Maharaj-Powada-Lyrics-in-Marathi-शाहीर-नानिवडेकर
———————————————————————–
———————————————————————–

Leave a Comment

error: Content is protected !!